ताज्या बातम्या

कराड तुळसणची वैष्णवी वीर वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय

कराड(प्रताप भणगे ) : शिवजयंती निमित्त श्री दत्त तरुण व पारायण मंडळ कोळे यांच्या वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सभाधीटपणा वाढावा तसेच आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. यासोबतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी हाही या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू आहे.
या स्पर्धेत तुळसण येथील वैष्णवी वीर हिने “हिंदवी स्वराज्य स्थापन करणे का गरजेचे होते?” या विषयावर प्रभावी व अभ्यासपूर्ण भाषण सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे विद्यालयाची मान उंचावली असून परिसरातून तिचे कौतुक होत आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह, पुस्तके व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोळे यांच्या वतीने अर्जुन गोपाळ कराळे (सदस्य, पंचायत समिती कराड), शिवाजी लोहार सर, दत्तात्रेय कराळे तसेच अमित सुभाष कराळे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
वैष्णवीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव पाटील, सचिव बी.आर. यादव, मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांच्यासह आनंदराव जानुगडे, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, अस्मिता पाटील, जयवंत काटेकर, शिवाजी नलवडे, संजय साळुंखे, विठ्ठल काटेकर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव माने, शिक्षणतज्ज्ञ दिलीपराव पाटील तसेच सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Scroll to Top