मुंबई : एस आय आर ड्युटी करणारे मृत शिक्षक कैलास भोयर यांच्या कुटुंबीयांना तात्काळ एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षणमंत्री मा. ना. श्री दादाजी भुसे यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच दीर्घकाळ वैद्यकीय उपचार सुरू असणारे, वय 55 वर्षापेक्षा जास्त असणारे, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या माता, एकल पालक यांना तातडीने बी एल ओ/एस आय आर कामातून वगळण्याची मागणी सुभाष मोरे यांनी केली आहे.
अपमानजनक वागणूक, सतत काम पूर्ण करण्यासाठी लावलेला तगादा, सुट्टीशिवाय चौदा ते पंधरा तास काम, काम अपूर्ण राहिल्यास एफ आय आर दाखल करण्याची धमकी इत्यादी अनेक कारणांनी कैलास भोयर सरांचा बळी घेतला आहे. त्यांच्या मृत्यूस शासकीय यंत्रणा जबाबदार आहेत.
BLO/SIR ड्युटी करताना
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी नाही,कोणतेही विमा संरक्षण नाही, प्रवासाची व्यवस्था नाही,वाहतूक भत्ता नाही,
इंटरनेट सुविधा नाही, अधिकृत मोबाईल नाही, कागदपत्रांचे ओझे वाहण्यासाठी शिपाई नाही, किमान मानवी सुविधा नाही,
कामाच्या बदली सुट्टी नाही, अशा बिकट स्थितीत काम करावे लागत आहे. त्यामुळे आत्महत्या अथवा हार्ट अटॅक सारखे प्रकार घडत आहेत.
*आंदोलनाची पुढील दिशा*
शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना निवेदन देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी शाळा समितीमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बी एल ओ/एस आय आर कामातून वगळण्याची मागणी करणारा ठराव मंजूर करून शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिव यांना पाठवावा. संबंधित ठरावाची एक प्रत शिक्षक भारती संघटनेच्या कार्यालयात पाठवावी, असे आवाहन सुभाष मोरे यांनी केले आहे.




