मुंबई : हेड अॅण्ड नेक (डोके व मान) कॅन्सरवरील उपचार यशस्वी झाल्यानंतरही सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांमध्ये कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो, त्यामुळे नियमित फॉलो-अप, वेळेवर तपासणी आणि जीवनशैलीतील बदल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे एसएसओ हॉस्पिटलचे हेड अॅण्ड नेक कॅन्सर सर्जन डॉ. अमित चक्रवर्ती यांनी सांगितले.
जागतिक हेड अॅण्ड नेक कॅन्सर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, भारतात तंबाखू, गुटखा, सुपारी, मद्यपान तसेच एचपीव्ही संसर्गामुळे या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. ३० ते ७५ वयोगटातील नागरिकांमध्ये हा आजार अधिक आढळत असून, तरुणांमध्येही एचपीव्ही-संबंधित घशाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.
एसएसओ हॉस्पिटलमध्ये दरवर्षी सुमारे ७०० ते ८०० हेड अॅण्ड नेक कॅन्सर शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, उपचारानंतरही काही रुग्णांमध्ये पहिल्या दोन ते तीन वर्षांत कर्करोग पुन्हा दिसून येतो. मात्र, याचा अर्थ उपचार अपयशी ठरले असा होत नाही. वेळेवर निदान झाल्यास पुन्हा शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा औषधोपचारांद्वारे आजारावर नियंत्रण मिळवता येते.
डॉ. चक्रवर्ती यांनी तंबाखू व मद्यपान पूर्णपणे टाळणे, असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणे हा कर्करोगाचा पुनरुद्भव टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगितले. याचबरोबर एसएसओ हॉस्पिटलमध्ये लवकरच अत्याधुनिक हेड अॅण्ड नेक कॅन्सर सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.




