मुंबई : दादर रेल्वेस्टेशनला खेटून असलेल्या फुटपाथवरून सुरू झालेल्या ‘बबनशेठच्या चहावाल्या’च्या प्रवासाने अनेक पत्रकार, कलाकार आणि सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात आपलेपणा आणि आठवणींचा ठेवा निर्माण केला. अशा ‘पत्रकारांचा चहावाला’ ‘बबनशेठ’च्या पंच्याहत्तरीनिमित्त २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि बबशेठ मित्रमंडळाने संयुक्तकपणे “एक चाय बबनसोबत” या कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन केले असून या सोहळ्याला माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, माजी आमदार, ज्येष्ठ पत्रकार कपिल पाटील आणि बबनशेठ मित्र मंडळाचे निमंत्रक गजानन दुधलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
बबनशेठ म्हणजे केवळ चहा विकणारा माणूस नव्हे, तर दादरच्या पत्रकारविश्वाचा अविभाज्य भाग. त्यांच्या चहाच्या टपरीवर अनेक पत्रकारांच्या गाठीभेटी रंगत, चर्चांना उधाण येत असे. ‘चाय पे चर्चा’ ही संकल्पना सर्वप्रथम त्यांनी नकळत रुजवली होती, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांच्या चहाच्या कपातून फक्त चव नव्हे, तर माणुसकीचा गोडवा मिळत असे, अशी भावना बबनशेठ मित्रमंडळाचे समन्वयक गजानन दुधलकर यांनी व्यक्त केली.
दादर स्थानकाबाहेरील त्यांच्या टपरीवर पत्रकार, नाट्यकर्मी, कलाकार, कामगार, राजकारणी अशा विविध क्षेत्रांतील लोकांची वर्दळ असायची. त्यांच्या चहाच्या कपाभोवती अनेक बातम्यांचे बीज रुजले, अनेक मैत्री जुळल्या आणि असंख्य आठवणी घडल्या. ‘बबनशेठचा चहा’ हीच एक वेगळी ओळख बनली होती.
या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कार सोहळ्यात बबनशेठ यांच्या कार्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या सहवासात राहिलेल्या पत्रकार, कलाकार आणि मित्रपरिवाराच्या आठवणींना उजाळा देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे.
“एक चाय बबनसोबत” हा केवळ कार्यक्रम नसून, अनेक दशकांच्या आठवणींचा, नात्यांचा आणि पत्रकारितेच्या अनोख्या संस्कृतीचा उत्सव ठरणार आहे. मुंबईतील पत्रकारांसाठी आणि बबनशेठच्या चाहत्यांसाठी हा सोहळा एक भावनिक क्षण ठरण्याची चिन्हे आहेत. बबनशेठशी मैत्री जडलेल्या प्रत्येकाने या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केले आहे.




