मुंबई(रत्नाकांत सावंत) : दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती शासनाच्या वतीने अत्यंत उत्साहात व भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. यावेळी लाखो अनुयायांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.
महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि पोलीस दल यांच्या वतीने कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनुयायांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी योग्य नियोजन व सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळी सुमारे ९.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, तसेच समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.
यावेळी हेलिकॉप्टरमधून चैत्यभूमीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला असून शासनाच्या वतीने बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. मुंबई मनपा कला-संगीत अकादमीच्या वतीने भीमगीतांचे सादरीकरण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या सामाजिक कार्यावर आधारित पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जी/उत्तर विभागातील मनपा अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, पोलीस दल तसेच समन्वय समितीचे नागसेन कांबळे व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता मुंबई मनपा संगीत अकादमीने राष्ट्रगीत सादर करून करण्यात आली. त्यानंतर लोकगायक अभिजीत व प्रसनेजीत कोसंबी या बंधूंनी भीमगीतांचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन मोहून टाकले.




