ताज्या बातम्या

स्वप्न पहा, त्यांचा पाठलाग करा, तरच यशस्वी व्हाल ; शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे कथन केले गमक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेंव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगताना दंतकथांमुळे ज्या घटना घडल्याच नाहीत त्या घटना लोकांमध्ये पसरविण्यात येत आहेत, असे परखडपणे सांगितले. मातीसाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर मातीसाठी कसे मरावे, हे छत्रपती शंभूराजे यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिले. शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, लेझीम पथक, तुतारी वादन, लहान मुलांच्या वेशभूषा, रांगोळ्या, ढोल ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मुखर्जी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे हा शिवजन्मोत्सव आयोजित केला होता. संघटनेचे अध्यक्ष शांताराम रामचंद्र चाळके, उपाध्यक्ष संजय विठोबा चव्हाण, सरचिटणीस राजेश गजानन दाभोळकर, सल्लागार सुबोध सखाराम सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सोहोळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रवींद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले.*

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top