ताज्या बातम्या

विषारी नागापेक्षाही महाबळेश्वर दुर्गम भागात बिबट्याच्या दहशतीने स्थानिक भूमिपुत्र अडचणीत…

बामणोली(अजित जगताप) : महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात व परिसरामध्ये सध्या माणसांपेक्षा बिबट्याच्या दहशतीने स्थानिक भूमिपुत्रांना रात्रीच्या अंधारापूर्वी घरात बंदिस्त व्हावे लागत आहे. जमिनीवर सरपटणारे विषारी नागापेक्षाही या भागात बिबट्याच्या दहशतीने स्थानिक भूमिपुत्र अडचणीत आले आहेत. याबाबत वन विभागाने दुर्घटना घडल्यानंतरच येण्याअगोदर माणुसकी म्हणून तरी पहावे. अशी मागणी झांजवड येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत जाधव व परिसरातील भूमिपुत्रांनी केली आहे.
मानवी वस्तीच्या उंबरठ्यापर्यंत बिबट्याचे आगमन झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना भात लागणा कडे लक्ष द्यावे की बिबट्याकडे? असा प्रश्न पडला आहे. शाळेतून ये जा करणाऱ्या मुलांसाठी एखादं रस्त्यात कुत्रे आडव्या आले तरी बिबट्या आले असे समजून त्यांच्या छातीची धडधड वाढत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या परिसरात बिबट्याने शिकारीसाठी पाळीव प्राण्यांवर सुद्धा हल्ले केले आहेत. परिसरातील अनेक कोंबड्या बकऱ्या , कुत्री , पाळीव जनावरे यांच्यावर हल्ला करून काहींना जखमी तर काहींचा जीव घेतला आहे. वाढलेल्या झाडे झुडपामध्ये लपून बसून बिबट्या अंदाज घेत आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजूर भात लागण साठी सुद्धा शेतात जाण्याकरिता घाबरत आहेत.
रात्रीच्या वेळी घरातून बाहेर न पडणे. सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमाला जाताना सोबत कोणालातरी घेऊन जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कोयता व कुऱ्हाड आणि शस्त्र घेऊनच आवश्यक वेळी बाहेर पडावे लागत आहे. मोठी जीवित हानी होण्यापूर्वीच संबंधित परिसरातील वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ आणि कडक उपाययोजना लागू कराव्यात. असे जागरूक नागरिक अनंत जाधव व स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे. बिबट्याच्या वाढत्या दहशतीवर शासनाने केवळ आश्वासने न देता बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी तात्काळ पिंजरे लावावेत व बिबट्याला जेरबंद करावे. रात्रीची विशेष गस्त सुरू करावी.ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचे अचूक लोकेशन शोधावे व सौरऊर्जेवरील विद्युत खांबावर दिव्यांची सोय वस्ती व शेतातील रस्त्यांवर करावी.बिबट्याच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पाळीव प्राण्यांची किंवा जखमी नागरिकांची आर्थिक भरपाई शासनाने त्वरित द्यावी. झांजवड, गोरोशी,कुंभरोशी,देवळी,दुधगाव,चतुरबेटघोणसपूर,हातलोट,दाभेमोहन,दाभेदाबेकर,बिरमणी,बिरवाडी,शिरणार,आकल्पे,तळदेव या भागामध्ये वन विभागाने तातडीने गस्तीपथक सुरू करावा दहशत मागवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करावे. यासाठी ग्रामस्थ वन वभागाला सहकार्य करण्यास नेहमीच पुढाकार घेतील असे स्पष्ट करण्यात आली आहे.

Scroll to Top