ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी २० वर्षीय तरुणीच्या पोटातील तब्बल साडेआठ किलो वजनाची दुर्मीळ गाठ यशस्वीरीत्या काढून वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि मोठ्या रक्तवाहिन्यांच्या अत्यंत जवळ असलेल्या या गाठीवरील शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी करून महापालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय क्षमतेचा प्रत्यय पुन्हा एकदा दिला.
संबंधित तरुणी गेल्या सहा महिन्यांपासून पोटदुखी आणि पोटावर वाढणाऱ्या सुजेने त्रस्त होती. तपासणीदरम्यान तिच्या पोटाच्या डाव्या बाजूचा भाग ओटीपोटापासून उदरापर्यंत मोठ्या गाठीने व्यापल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासणीत सुमारे दीड फूट लांब आणि एक फूट रुंद आकाराची गाठ असल्याचे स्पष्ट झाले.
सुदैवाने या गाठीमुळे इतर महत्त्वाच्या अवयवांना थेट इजा झाली नव्हती. त्यामुळे शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. सर्जरी विभागातील डॉ. वर्षा पाटील, डॉ. क्षितीज माने, डॉ. शुभम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. विभागप्रमुख डॉ. अरुण माने यांनी संपूर्ण प्रक्रियेत मार्गदर्शन केले.
भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. विजय पाटील आणि डॉ. केतकी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संजना पाटील यांनी भूल देण्याची जबाबदारी पार पाडली. तसेच रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम आणि अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर यांचेही या शस्त्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
शस्त्रक्रियेनंतर तरुणीच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली असून गाठ काढल्यानंतर तिचे वजन सुमारे सहा ते सात किलोने कमी झाले आहे.
याबाबत माहिती देताना अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी सांगितले की, पोटाच्या मागील भागात (रेट्रोपेरिटोनियल भागात) एवढ्या मोठ्या आकाराच्या गाठी अत्यंत दुर्मीळ असतात. मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि मोठ्या रक्तवाहिन्यांच्या अगदी लगत असल्यामुळे अशा गाठींवरील शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची आणि आव्हानात्मक मानली जाते. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.




