मुंबई : महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवरून इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD), असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (ASMI) तसेच सर्व स्पेशालिस्ट राज्य संघटनांनी संयुक्त आंदोलनाची घोषणा केली आहे. शासनाशी अनेकदा सकारात्मक चर्चा करूनही विशेषतः प्रस्तावित BHMS–CCMP नोंदणी प्रक्रिया तसेच निवासी डॉक्टरांच्या सेवा, प्रशिक्षण आणि कल्याणाशी संबंधित मागण्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, या प्रश्नांचा रुग्णांच्या सुरक्षिततेवर, वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि राज्यातील आरोग्यसेवेच्या विश्वासार्हतेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासून ६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत नियमित (Elective) आणि आपत्कालीन नसलेल्या (Non-Emergency) वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.
याचबरोबर, ६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत शासनाकडून ठोस आणि समाधानकारक निर्णय न झाल्यास आपत्कालीन सेवांसह बेमुदत सेवा बंद आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.
वैद्यकीय नैतिकता आणि रुग्णहिताशी आपण कायम बांधील असल्याचे नमूद करत, शासनाने BHMS–CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करून संबंधित सर्व प्रश्नांवर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी डॉक्टर संघटनांनी केली आहे.



