
मुंबई : धारावीसारख्या झोपडपट्टी परिसरात शून्यातून विश्व उभे करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे कांबळे कुटुंबीय. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी स्थापन केलेल्या नरेंद्र छाया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटने गेल्या २६ वर्षांत शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून हजारो कुटुंबांचे जीवन उजळून टाकले आहे.
संस्थेची अधिकृत नोंदणी करून धारावीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत संगणक शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. कालांतराने या उपक्रमाने व्यापक स्वरूप धारण केले. आजवर तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देत संस्थेने डिजिटल साक्षरतेचा दीप प्रज्वलित केला आहे. याशिवाय १० हजार विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत अनेकांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे.
दरवर्षी दहावी व बारावीच्या सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करून संस्थेने शिक्षणासाठी भक्कम पाठबळ दिले आहे.
सन २००६ मध्ये सर्वाधिक प्रवेश नोंदणी केल्याबद्दल संस्थेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “उत्कृष्ट कॉम्प्युटर संस्था” म्हणून सन्मानित करण्यात आले होते. विविध वृत्तपत्रांनीही त्यांच्या कार्याची दखल घेत विशेष गौरव केला आहे.
संस्थेचे सर्वेसर्वा विश्वस्त दिनेश अर्जुन कांबळे यांनी आपल्या वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे नेत “शून्यातून विश्व” उभारण्याची परंपरा कायम राखली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था सातत्याने सामाजिक, शैक्षणिक आणि कौशल्यविकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.
या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त नरेंद्र छाया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला “उत्कृष्ट संस्था” या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह येथे, सेक्टर ४/५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




