ताज्या बातम्या

अखंड निष्ठेचा चाफा कोमेजला… बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचा ‘पुजारी’ काळाच्या पडद्याआड;आप्पा पाटील यांचे निधन

प्रतिनिधी : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या २०१२ मधील निधनानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतीस्थळ अनेक शिवसैनिकांसाठी श्रद्धेचे स्थान बनले. या पवित्र स्थळाशी जिवाभावाने नाळ जोडणाऱ्या मोजक्या निष्ठावंतांमध्ये संदीप पाटील उर्फ आप्पा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाई.
प्रारंभी शाखाप्रमुख यशवंत विचले यांनी शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज चाफ्याची फुले अर्पण करण्याचा संकल्प केला. पुढे आप्पांनी ही परंपरा आपल्या खांद्यावर घेतली आणि तब्बल १३ वर्षे अखंड, निस्वार्थ भावनेने ती जपली. कोणी साथ देओ वा न देओ—स्वखर्चाने, न चुकता, दररोज चाफ्याचा सुगंध बाळासाहेबांच्या स्मृतींना अर्पण होत राहिला.
जयंती असो, स्मृतिदिन असो किंवा कोणताही उत्सव—आप्पांची उपस्थिती हमखास असे. स्मृतीस्थळी कोणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यावर त्या जागेचे पावित्र्य राखण्यासाठी दूधाचा अभिषेक करण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. म्हणूनच धगधगती मुंबई वृत्तपत्राने त्यांचा उल्लेख “बाळासाहेबांचे पुजारी” असा केला होता.
असा हा हसतमुख, प्रेमळ आणि निष्ठावंत शिवसैनिक अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निघून गेला. स्मृतीस्थळावर दरवळणारा चाफ्याचा सुगंध आजही त्यांच्या निष्ठेची साक्ष देत राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top