पनवेल(अमोल पाटील) : महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका २०२६ या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मतदानासाठी अवघे १८ तास शिल्लक आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक अधिकारी आपापल्या मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या गटातील उमेदवारांसाठी पांढऱ्या रंगाचा बॅलेट पेपर, तर पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी गुलाबी रंगाचा बॅलेट पेपर देण्यात आला आहे. या रंगभेदामुळे मतदारांना मतदान करताना कोणताही गोंधळ होणार नाही, असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.
दोन्ही बॅलेट पेपरवर उमेदवारांचे नाव व निवडणूक चिन्ह स्पष्टपणे दिसून येत असल्याने मतदारांना अचूक आणि सूक्ष्म पद्धतीने मतदान करता येणार आहे. प्रचारादरम्यानही उमेदवारांकडून मतदारांना बॅलेट पेपरवरील रंग, नाव व चिन्ह याबाबत माहिती देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरसाठी वापरलेला वेगळा रंगकोड मतदारांसाठी अधिक सोपा, स्पष्ट आणि पारदर्शक मतदानाचा अनुभव देणारा ठरणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.




