ताज्या बातम्या

राजकारणातील अपप्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन; १०५ गावांच्या समाजाला राजाराम बुवा शेलार यांचा भावनिक संदेश

महाबळेश्वर : आज महाराष्ट्रातील राजकारणाकडे पाहताना मन अस्वस्थ, व्यथित आणि कधी कधी लाजिरवाणे वाटते, अशा शब्दांत कोयना रत्न भजनसम्राट राजाराम बुवा शेलार यांनी आपल्या १०५ गावांच्या समाजबांधवांसाठी भावनिक आणि विचारप्रवर्तक संदेश दिला आहे. नको त्या मार्गाने मिळवलेला पैसा लोकांवर उधळला जात असताना, तो स्वीकारताना आपण नकळत स्वतःच्या संस्कारांवर, स्वाभिमानावर आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्यावर घाला घालत आहोत, याची जाणीव समाजाने ठेवावी, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
१०५ गावांचा समाज कोणाच्या दयेवर उभा राहिलेला नसून तो कष्ट, श्रम आणि स्वाभिमानावर उभा आहे, हा आपला इतिहास आणि अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “१०५ म्हणजे ग्यानबाची म्याक!” हे केवळ घोषवाक्य नसून समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. कोणत्याही आमिषासाठी किंवा तात्पुरत्या फायद्यासाठी हा स्वाभिमान गहाण ठेवू नये, हीच अंतःकरणातून निघालेली प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या परिसराचा शाश्वत आणि टिकाऊ विकास केवळ निवडणुकांपुरता न राहता कायमस्वरूपी इथे राहून, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होत ज्यांनी केला, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद आबा पाटील, संजूबाबा गायकवाड व त्यांचे सहकारी नेहमीच समाजाच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे शेलार यांनी नमूद केले. रस्ते, पाणी, वीज, दळणवळण यांसारख्या मूलभूत गरजांकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही, असेही त्यांनी सांगितले.
महाबळेश्वर तालुक्यांचे भाग्यविधाते, कैलासवासी बाळासाहेब दादा भिलारे यांनी कोयना व कांदाटी–सोळशीच्या दर्‍या-खोऱ्यातील गावांचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून दूरदृष्टीपूर्ण आराखडा तयार केला होता. आज सुरू असलेली बहुतांश कामे ही त्या मंजूर आराखड्याचाच पुढचा टप्पा असून, नवीन असल्याचा भास निर्माण केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
स्वर्गीय अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर ती केवळ फोटोला हार घालून नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देऊन त्यांच्या विचारांना आणि विकासाच्या ध्येयाला पुढे नेण्यातच आहे, अशी स्पष्ट भूमिका राजाराम बुवा शेलार यांनी मांडली.
हा संदेश राजकारणासाठी नसून १०५ गावकऱ्यांच्या आत्मपरीक्षणासाठी असल्याचे सांगत, “आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत आणि पुढच्या पिढ्यांना काय देऊन जाणार आहोत?” हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा, असे आवाहन त्यांनी केले. शेवटी सर्व समाजबांधवांच्या आरोग्य व सुखस्वप्नांसाठी माऊलीचरणी प्रार्थना करत त्यांनी आपल्या विचारांना विराम दिला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top