प्रतिनिधी : घनसोली येथे येळगाव जिल्हा परिषद व सवादे पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. आनंदराव जयसिंगराव पाटील (राजाभाऊ) – येळगाव जिल्हा परिषद उमेदवार, संजय बाबुराव शेवाळे – सवादे पंचायत समिती उमेदवार आणि सौ. संगीता संजय शेटे – येळगाव पंचायत समिती उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय शेटे होते. उपस्थित कार्यकर्ते, ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
अध्यक्ष संजय शेटे यांचे मार्गदर्शन – विकासासाठी भाजपच एकमेव पर्याय
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय शेटे यांनी आपल्या भाषणात विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत म्हणाले की,
“आपण वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलो तरी गावाचा सर्वांगीण विकास हाच आपला समान उद्देश आहे. स्वर्गीय विलास काकांनी या भागात मोठ्या प्रमाणावर विकासाची पायाभरणी केली. 2014 नंतर केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर सामान्य माणसापर्यंत थेट योजना पोहोचू लागल्या.” ते पुढे म्हणाले, “वाड्या-वस्त्यांचा विकास करायचा असेल तर आज भाजप हा एकमेव सक्षम पर्याय आहे. मुख्यमंत्री आणि शासनाशी थेट संपर्क असलेले आमदार डॉ. अतुल भोसले यांचे मजबूत नेतृत्व आपल्याला लाभले आहे. तरुणांना व्यासपीठ मिळत आहे, ही बदलाची नांदी आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत सर्व भाजप उमेदवारांना निवडून देणे ही काळाची गरज आहे.”
ॲड. आनंदराव पाटील (राजाभाऊ) यांचा आत्मविश्वासपूर्ण निर्धार
येळगाव जिल्हा परिषद उमेदवार ॲड. आनंदराव पाटील (राजाभाऊ) म्हणाले, “ही निवडणूक जिल्हा पंचायत निवडणुकीच्या इतिहासात नोंद होईल असा विजय देणारी ठरेल. मुंबईसारख्या ठिकाणी कष्ट करून आपल्या कुटुंबापासून दूर राहून जे कार्यकर्ते आपल्या भागासाठी झटत आहेत, त्यांच्या प्रयत्नातून गावात विकास झाला पाहिजे.” ते पुढे म्हणाले,“विकासाची भूक आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे. जोपर्यंत कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, तोपर्यंत गावाचा खरा विकास होणार नाही. हीच शिकवण आपल्याला पूर्वीच्या नेत्यांनी दिली आहे.”
संपत शेवाळे यांचा विकासकामांचा आढावा
माजी नगरसेवक संपत शेवाळे यांनी सांगितले,
“पूर्वी पाणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव होता. आज विविध शासकीय योजनांमुळे खऱ्या अर्थाने विकास होताना दिसत आहे. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जात-पात न पाहता सर्वसामान्यांना आधार दिला.”
ते पुढे म्हणाले, “कोरोना काळात अतुल बाबांनी जनतेसाठी जे काम केले, ते विसरता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया.”
संजय शेवाळे यांचे आवाहन,cसवादे पंचायत समिती उमेदवार संजय बाबुराव शेवाळे यांनी नागरिकांना आवाहन करत म्हणाले की,

“आपला एक दिवस जर आपण आपल्या विभागासाठी दिला, तर पुढील पाच वर्षांचा विकास निश्चित करता येईल. एकजुटीने भाजपच्या उमेदवारांना विजयी करूया.”
स्नेहमेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, येळगाव–सवादे विभागात भाजपच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.




