तापोळा(नितीन गायकवाड) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचा प्रचार अधिक तीव्र झाला असून लालबाग–परळचे माजी आमदार दगडू दादा संकपाळ यांनी महाबळेश्वर तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देत स्वतः प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग घेतला आहे. नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही निवडणूक सत्तेची नसून विकासाची लढाई आहे, असे ठाम मत व्यक्त करत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार दगडू दादांनी केला.
महाबळेश्वर ते तापोळा प्रवासादरम्यान शिंदे साहेबांच्या दूरदृष्टीने झालेल्या विकासकामांमुळे मनाला समाधान मिळाल्याचे दादांनी सांगितले. तापोळा–महाबळेश्वर रस्त्याचे सुदृढीकरण, तापोळा ते आहीर पूल, आपटी–तापोळा पुलाला मंजुरी, तसेच बामनोली–दरे पुलाच्या कामामुळे कोयना विभाग, सोळशी, कांदाटी परिसरातील कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
तापोळा गावातील शिवसेना कार्यालयात आगमनानंतर विद्यमान सरपंच रमेश धनावडे यांच्या नेतृत्वाखाली गावाचा झालेला कायापालट दादांनी आवर्जून अधोरेखित केला. बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण, जिल्ह्यातील एकमेव आदर्श शाळा, नवीन ग्रामपंचायत इमारत, शिवसागर बोट क्लब व विशाल बोट क्लब परिसरातील संरक्षण भिंती अशा विविध विकासकामांचे त्यांनी कौतुक केले. राज्यातील गोरगरीब, शेतकरी व कष्टकरी वर्ग शिंदे साहेबांच्या विचारांशी सहमत असून विकासाच्या बदल्यात मायभूमीत भगवा फडकवून ऋण फेडू, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
यावेळी आहीर गावचे ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ दादा संकपाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आहीर गावातून शंभर टक्के मतदान करून साहेबांचे ऋण फेडण्याची भावना व्यक्त केली. दगडू दादांचा सत्कार करताना उपस्थितांच्या भावना अनावर झाल्या.
कार्यक्रमास शिवसागर बोट क्लबचे चेअरमन आनंद धनावडे, काळेश्वरी क्लबचे चेअरमन आनंददादा संकपाळ, निहाल उद्योग समूहाचे अशोक दादा संकपाळ, युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल दादा संकपाळ, तालुकाप्रमुख गणेश उत्तेकर, पंचायत समिती उमेदवार संजय शेलार, बाळकृष्ण माने, विजय सकपाळ, गंगाराम दादा संकपाळ, नारायण दादा संकपाळ, बबन सकपाळ, तसेच विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उमेदवार संजय शेलार यांनी आमदार एकनाथजी शिंदे साहेब व दगडू दादा संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याची घोषणा करत, जनतेच्या आशीर्वादाने विजयी करण्याचे आवाहन केले.




