सातारा(विजय जाधव) : सध्या सातारा जिल्ह्यात गावोगावी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. मोठ्या उत्साहात अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांची एकूण लोकसंख्या ३३ लाखांहून अधिक आहे. या लोकसंख्येच्या पटीत प्रत्येक गावात वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘एक व्यक्ती-एक झाड ‘या उपक्रमासाठी अभियानात १०० पैकी २ गुण निश्चित केले असून, गुणांच्या स्पर्धेत आघाडी मिळविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी ही ऐतिहासिक संधी ग्रामपंचायतींना मिळाली आहे. गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड केली तर २ गुण मिळणार आहेत.
सातारा जिल्ह्यात आधीच पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच सकारात्मक विचार आणि कृती होते. त्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही गावाचा सर्वांगीण विकासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुरक स्पर्धा आहे. या स्पर्धेत २ गुणांसाठी गावची लोकसंख्या तेवढी वृक्ष लागवड ही अभियान काळात करावी लागणार आहे. प्रत्येक गावात श्रमदानातून खड्डे, वृक्षारोपण करणे हा उपक्रम जोमात सुरू झाला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण या कार्यात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कुठे शाळकरी मुले उत्साहाने रोपटी लावताना दिसत आहेत, तर कुठे जेष्ठ नागरिक, महिला मंडळी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेत आहेत.
*बरसणाऱ्या पाऊसाचे ठरणार वरदान*
सध्या सर्वत्र मान्सून बरसत असल्याने लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन नैसर्गिकरीत्या सुलभ होणार आहे. ओलसर माती, पावसाचे पाणी आणि शेतकऱ्यांचा अनुभव या सर्व घटकांचा एकत्रित फायदा होत असल्याने, वृक्षलागवड केवळ औपचारिक न राहता टिकाऊ स्वरूप धारण करेल.
*शाश्वत पर्यावरण बहरणार*
सध्या गावोगावी या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्याची नैसर्गिक श्रीमंती पुन्हा बहरणार आहे. वृक्ष केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, पाणी व सुपीक माती यांचा वारसा निर्माण करतात. जंगल संपदा, जैव विविधता आणि हवामान संतुलन या सर्व बाबींमध्ये ही वृक्षलागवड मोलाचा वाटा उचलणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीकडून या अभियानात अग्रेसर राहण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जात असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.
हिरवाईला येईल बहर
सातारा जिल्ह्यात अनेक गावात सातत्याने वृक्षसंवर्धन करून मोठ्या प्रमाणावर हिरवाई आहे. त्यात अभियान काळात ही स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा लोकसंख्येच्या पटीत वृक्ष लागवड होणार असल्याचे मोठ्या उत्साहात यात गावोगावी सहभाग दिसत आहे. तर समृद्ध पंचायतराज अभियानातून सुरू झालेली ही हरित चळवळ बहरणार असून राज्यासाठी आदर्श ठरणार आहे.
बाळासाहेब शिंदे
समन्वयक
नाम फाऊंडेशन, महाराष्ट्र