मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर नव्या पदाचे चिन्ह लावून पदभार स्वीकारण्याचा समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
परिवहन विभागाच्या इतिहासातील हा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. याअंतर्गत ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीनंतर अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून राज्यात रस्ता सुरक्षा वाढविणे आणि अपघाती मृत्यू रोखणे हीच खरी सेवा असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी केले.
या प्रसंगी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी नव्याने पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना कार्यनिष्ठा आणि जनहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.