मुंबई, २१ ऑगस्ट
: धारावी परिसरात डम्पिंग ग्राऊंडसारखी परिस्थिती निर्माण झाली असून रहिवाशांना अस्वच्छता, दुर्गंधी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे जगणे कठीण झाले आहे. खांबादेवी मंदिर ते धारावी कोळीवाडा साईबाबा मंदिर या भागात केलेल्या व्हिडिओ शूटमधून उघडकीस आलेले वास्तव धक्कादायक आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की परप्रांतीयांनी सुरू केलेल्या अनधिकृत कारखान्यांतून पडणारा कचरा, त्याचे बिल वसुलीतील गैरप्रकार आणि भूमिपुत्रांना रोजगार नाकारून बाहेरच्यांचे साम्राज्य वाढत आहे. “सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई”च्या घोषणा दिल्या जात असल्या तरी महानगरपालिका अधिकारी, BEST विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प असल्याची धारावीकऱ्यांची नाराजी आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसेचे उपविभागाध्यक्ष कौशिक कोळी यांनी महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत. ठेकेदार आणि अधिकारी संगनमत करून मोडक्या कचऱ्याच्या गाड्यांद्वारे जनतेची दिशाभूल करत असल्याचा त्यांनी आरोप केला. परिस्थितीची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
धारावीकऱ्यांचा सवाल कायम आहे – या बकाल परिस्थितीची जबाबदारी शेवटी घेणार कोण?