नवी मुंबई : कोपरखैरणे, ऐरोली, तुर्भे, घणसोली, सानपाडा, नेरूळ या भागांतील वाढीव बांधकामे, माथाडी वसाहती आणि एल.आय.जी. घरे तोडण्याच्या महापालिका कारवाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य कुटुंबांनी कर्ज काढून घेतलेली घरे तोडण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट याच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा गुरुवार, ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता पाम बीच रोडवरील गंगारामशेठ तांडेल चौक (सेक्टर ५०) येथून सुरू होऊन, नवी मुंबई महापालिका मुख्यालय व सिडको भवनकडे जाईल. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे करत असून, मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी शासन व पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. विधान परिषदेतही त्यांनी यावर आवाज उठवला असून, तरीही अद्याप शासनाकडून समाधानकारक निर्णय झालेला नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करत नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मात्र नागरिकांच्या दैनंदिन जगण्याचा विचार न करता अशी कारवाई केली जाणे अन्यायकारक असून, ती त्वरित थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि तालुका अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवत मोर्चाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपले हक्क आणि घरे वाचवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.