प्रतिनिधी : भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात १ ते ४ जुलै दरम्यान शांततामय धरणे आंदोलन सुरू आहे. समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी, लोकशाही मार्गाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी राज्यभर संवाद यात्रा राबवून समाजाच्या अडचणींचे दस्तावेजीकरण करण्यात आले होते. मात्र मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंदोलनात पाच प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत — भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय, नागरिकत्वासाठी आवश्यक दस्तऐवज देणे, अतिक्रमित जमिनी नियमित करणे, विशेष संरक्षणकायदा लागू करणे व ३१ ऑगस्ट ‘विमुक्त दिन’ म्हणून घोषित करणे.
१ जुलै रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने मागण्या मान्य न केल्यास ४ जुलै रोजी विधानभवनावर मोठ्या प्रमाणात समाजबांधव जमणार असल्याचा इशारा संयोजन समितीने दिला आहे.