ताज्या बातम्या

गोकुळ कॉम्प्लेक्समधील धोकादायक ट्रान्सफॉर्मरकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आजीवली (अमोल पाटील) : पनवेल तालुक्यातील आजीवली येथील गोकुळ कॉम्प्लेक्समधील विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विटांच्या बांधकामावर बसविण्यात आलेल्या या ट्रान्सफॉर्मरच्या आधारभूत बांधकामाला काही दिवसांपासून भेगा पडल्याचे दिसून येत असून, पावसाळ्यात हे बांधकाम कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोकुळ कॉम्प्लेक्समध्ये सुमारे ४०० ते ५०० घरांचा वीजपुरवठा या ट्रान्सफॉर्मरवर अवलंबून आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा आधार असलेले बांधकाम कमकुवत झाल्यास केवळ वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

या समस्येबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी, तसेच भिंगार येथील सहाय्यक अभियंता महाडिक साहेबांशी वेळोवेळी चर्चा करून समस्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मात्र, अद्याप ट्रान्सफॉर्मरच्या आधारभूत बांधकामाची आवश्यक दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने भेगा पडलेल्या विटांच्या बांधकामावर पावसाचे पाणी झिरपल्यास त्याची स्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ट्रान्सफॉर्मरचा भार पेलणाऱ्या संरचनेबाबत तातडीने तांत्रिक तपासणी करणे आवश्यक आहे. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गोकुळ कॉम्प्लेक्समधील मोठ्या संख्येने कुटुंबांचा वीजपुरवठा या ट्रान्सफॉर्मरवर अवलंबून असल्याने त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास मोठ्या परिसरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने या ट्रान्सफॉर्मरची तातडीने पाहणी करून आधारभूत बांधकामाची मजबुती तपासावी, अशी मागणी जोर धरत आहे.

भेगा पडलेल्या बांधकामाची तातडीने दुरुस्ती करून ट्रान्सफॉर्मरसाठी सुरक्षित व मजबूत आधारव्यवस्था निर्माण करावी, तसेच आवश्यक असल्यास तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित ठिकाणी ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, कोणतीही दुर्घटना घडल्यास यास प्रशासन जबाबदार राहील. अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Scroll to Top