सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यामध्ये जो पक्ष सत्तेमध्ये सामील होतो. त्या पक्षाचा बालेकिल्ला तयार करण्याचा पॅटर्न आलेला आहे. याचा अनुभव सर्वच राजकीय पक्षांनी घेतला आहे. आता तर श्रावण मास आरंभ सुरू होण्याच्या दिवशीच गुरुवारी दिनांक १३ ऑगस्ट रोजी साताऱ्यात भाजप बैठकीत सामान्य कार्यकर्त्याची फरपट झाली. अखेर वरिष्ठ भाजप नेत्यांनी शिस्तीने वागा. असा सल्ला देऊन हे प्रकरण कमळाच्या पाकळीत मिटवण्याचा प्रयत्न केला. घर घर तिरंगा झेंडा पोहोचवण्याची जबाबदारी भाजप नेत्यांनी मोठ्या उत्साहात पार पाडले असतानाच जावळी तालुक्यात भाजप पक्षालाच घरघर लागल्याचे दिसून आले आहे. दरम्यान भाजप बैठकीचे जे वृत्त प्रसिद्ध झाले की निव्वळ अफवा आहे असा खुलासा श्रीहरी गोळे यांनी दिला आहे
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा भाजपच्या वतीने सेवा अभियान विक्रम चव्हाण निमित्त सातारा शहरातील सातारा जिल्हा शासकीय विश्रामगृहामध्ये सकाळी दहा ते सायंकाळपर्यंत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजपचे निष्ठावंत तसेच नवोदित कार्यकर्ते- पदाधिकारी व वरिष्ठ नेते विक्रम पावसकर, आमदार धैर्यशील कदम, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक संतोष साखरे , सरचिटणीस महिला आघाडी मनीषा पांडे, विठ्ठल बलशेठवार व विकास गोसावी, भाजप जावळी तालुका अध्यक्ष संदीप परामणे, उपाध्यक्ष विकास धोंडे, माजी सरचिटणीस प्रदीप बेलोशे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व भाजप प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप पक्षाच्या ध्येयधोरणानुसार कार्यक्रम राबवण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. अनेक भाजप कार्यकर्त्यांनी सेवा अभियानामध्ये आपापल्या भागात केलेल्या सेवा अभियानात अनेकांची निवेदन घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले. कामाचा आढावा घेतला.
याच वेळी जावळी तालुक्यातील भाजप जिल्हा परिषद सदस्य व वजनदार नेते वसंतराव मानकुमरे व जावळी तालुक्यातील माजी अध्यक्ष तथा हातगेघर येथील अटल पर्यटन व बहुउद्देशीय संस्था मर्यादित चेअरमन श्रीहरी गोळे यांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक सामना रंगला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विकास सेवा सोसायटीच्या मतदारसंघातून ठराव घेण्यासाठी गेल्या आठवड्यात नाट्य घडले. हातगेघर, कावडी, पानस, विवर ,सायघर, आखेगणी ग्रुप विकास सेवा सोसायटीच्या ठरावाबाबत मिठाचा खडा पडला. आणि हा ठराव बारगळला. याचा राग मनात धरून भाजपच्या सेवा सप्ताह बैठकीतच आगळीवेगळी सेवा सुरू झाली. जिल्हा परिषद सदस्य श्री . मानकुमरे व श्री गोळे यांनी एकमेकांचा चांगलाच सन्मान केला. भाजपचे या दोन मातब्बर नेत्यांची हातघाई पाहून अखेर भाजप जावळी तालुका अध्यक्ष संदीप परामणे यांनीच मध्यस्थी करून दोघांना शांत केले.
सदर झालेल्या प्रकाराने व्यतीत झालेल्या भाजपचे वरिष्ठ नेते विक्रम पावसकर यांनी सर्वांनाच मग खडे बोल सुनावले. ही काँग्रेस- राष्ट्रवादी नाही. भाजप आहे. शिस्तीने वागा .असा सल्ला दिला. खरोखरच अशा सल्ल्याची गेल्याच आठवड्यात गरज होती. परंतु, पहिला अंक संपल्यानंतर दुसरा अंक सुद्धा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. असा भाजप पक्षातील पारदर्शक कारभार असल्यामुळे हा दुसरा अंक सुद्धा सातारा शासकीय विश्रामगृहामध्ये कार्यकर्ते व लोकांसमोर आलेला आहे. आता तिसरा अंक काय घडते? याकडे आता उत्सुकता लागलेली आहे. तसं पाहिलं तर वीस एक वर्षांपूर्वी भाजपा शिस्तीचा पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी सुद्धा भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सातारा जिल्ह्यात सन्मानाने पाहत होते. आता फक्त सत्तेची ऊब आपल्यापर्यंत पोहोचावी. यासाठी नेते धडपडतात म्हणून कार्यकर्ते त्याचे अनुकरण करतात. त्यामुळेच असा प्रकार घडला आहे. भाजपच्या या बैठकीमध्ये झालेल्या प्रकारामुळे भाजप सामान्य कार्यकर्ता सुरक्षित नसेल तर भाजपचे काम करून कुणाची सुरक्षा व सेवा आपण करू शकतो? याचे आता आत्मचिंतन करावे लागणार आहे.
भाजपमध्ये अनेक निष्ठावंत व प्रामाणिक नेते व पदाधिकारी आहेत. परंतु त्यांनाही सत्तेचे गणित जुळवताना काँग्रेसमय वातावरण स्वीकारावे लागत आहे. याचा अनुभव घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. झालेल्या प्रकारामुळे भाजपमध्ये इतर पक्षाचे संस्कृतीचा शिरकाव झाला. हे तरी आता मान्य करावे. असे आता सुचित करावे वाटत आहे. अशी खंत जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, भाजपने जिल्हा परिषदेमध्ये व काही पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवली आहे. आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी हॅट्रिक करण्याची वेळ आली आहे. दोन्ही सत्ता मिळवताना राडा झाला. आता हॅट्रिकच्या वेळेला भाजपने एकमेकांचे डोके फोडू नये. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याबाबत जावळी तालुक्यातील दोन्ही नेत्यांची संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा भुंगा कमळात अडकला की काय? अशी शंका घेतली जात आहे.
————————–
फोटो- सेवा सप्ताह आढावा घेताना भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते (छाया- अजित जगताप, सातारा)




