मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या आणि सतत गजबजलेल्या सीएसटी-मुख्यालय रेल्वे स्थानकातील प्रसाधनगृहांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रसाधनगृहासारख्या अत्यावश्यक सुविधेतच पाणी नसल्याने येथील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. त्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच दिव्यांग प्रवाशांचाही समावेश असतो. अशा परिस्थितीत प्रसाधनगृहात पाणी उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. पाण्याअभावी प्रसाधनगृहाची स्वच्छता राखणेही कठीण होत असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, सीएसटी-मुख्यालयसारख्या महत्त्वाच्या स्थानकात प्रसाधनगृहातच पाणी नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या स्वच्छता आणि सुविधा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रसाधनगृहातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, नियमित स्वच्छता करावी आणि भविष्यात अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी योग्य देखभाल व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
“प्रवाशांकडून तिकीट आकारले जाते, मग त्यांना स्वच्छ आणि मूलभूत सुविधा मिळणार कधी?” असा सवालही प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



