ताज्या बातम्या

उंडाळे ग्रामीण चॅम्पियन ट्रॉफीचे पर्व-४; १५ व १६ ऑगस्टला जिंतीत क्रिकेटचा थरार

कराड(अमोल पाटील)जिंती, ता. कराड, जि. सातारा : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरणाऱ्या ‘उंडाळे ग्रामीण चॅम्पियन ट्रॉफी- पर्व ४’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. जिंती (महारूगदेवाडी) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ही स्पर्धा रंगणार असून परिसरातील क्रिकेटपटूंमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या स्पर्धेत विजेत्या संघाला १५ हजार रुपये, उपविजेत्या संघाला ७ हजार रुपये, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी ३ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी वैयक्तिक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २,५०० रुपये ठेवण्यात आले असून, संघांनी आयोजकांकडे संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सामने क्रिकेटप्रेमींना प्रत्यक्ष मैदानावर पाहता येणार असून ‘कृष्णा लाईव्ह’ यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे मैदानावर उपस्थित राहता न येणाऱ्या क्रिकेटप्रेमींनाही सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

स्पर्धेच्या आयोजनासाठी रणवीर स्पोर्ट्स, शशिराज स्पोर्ट्स, संतोष पाटील (बंडा सर), सुरेश भाव आणि विशाल पाटील यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमितराज चव्हाण, कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप देसाई तसेच कराड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

स्पर्धेच्या जाहिरातीनुसार, संघ नोंदणी व सामने याबाबत काही विशिष्ट नियम आयोजकांनी निश्चित केले असून, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. संघांनी आयोजकांनी दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. संघ पूर्ण न झाल्यास सामन्यांच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय स्पर्धा समितीकडे राहणार असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या क्रिकेट महोत्सवासाठी मा. सचिन दादा लामणे साहेब, मा. दीपक दादा लोंढे साहेब, मा. मोहन नायकवाडी मामा साहेब, मा. बाबासो बागल साहेब आणि मा. अमितराज चव्हाण साहेब यांच्यासह विविध मान्यवरांचे विशेष आभार आयोजकांनी व्यक्त केले आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १५ व १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या स्पर्धेमुळे जिंती परिसरात क्रिकेटचा उत्साह वाढणार असून, सर्व क्रिकेटप्रेमींनी या भव्य स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Scroll to Top