ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ दादर कट फ्लॉवर्स बाजारपेठ चार दिवस बंद;शेतकरी व व्यापारी वर्गांनी सहकार्य करण्याचे आवाहन

मुंबई (भीमराव धुळप) : दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनच्या अध्यक्ष श्री. सोपान शेठ दुराफे यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यावर अनधिकृत व्यापाऱ्यांकडून झालेल्या कथित भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दि. १५ ते १८ ऑगस्ट २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत दादर कट फ्लॉवर्स बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे.
या बंदला सर्व फुलशेती उत्पादक शेतकरी बांधव, वाहतूक व्यवस्थेशी संबंधित घटक तसेच ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.
दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनची स्थापना सन १९९५ मध्ये झाली असून, असोसिएशन अधिकृतरीत्या नोंदणीकृत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अधिकृत फुल व्यापारी दादर परिसरात पहाटे ४ ते सकाळी ७ या वेळेत फुटपाथवर फुलविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. मात्र, १९९५ पासून अधिकृतपणे व्यवसाय करतात. तरीही व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
कायमस्वरूपी फुल बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सध्या ज्या ठिकाणी फुलबाजार भरतो, त्याच ठिकाणी शासनाने योग्य नियोजन करून मोठे व्यापारी संकुल किंवा कायमस्वरूपी फुल मार्केट उभारावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.
दरम्यान, अनधिकृत व्यापाऱ्यांच्या कथित कृत्यांमुळे अधिकृत व्यापाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई होत असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच खरेदी केलेल्या फुलशेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.
सुमारे पाच महिन्यांपूर्वी असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध फुलशेती उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन आपला फुलशेतीमाल अधिकृत व्यापाऱ्यांनाच विक्रीसाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे असोसिएशनने सांगितले.
शेतकरी आणि अधिकृत फुल व्यापाऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी फुल बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अनधिकृत व्यवसायाला आळा घालावा आणि १९९५ पासून अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनने केली आहे.

Scroll to Top