नवी मुंबई : घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत शाळा स्तरावर प्रत्येक दिवशी राबवावयाच्या उपक्रमांविषयी नमुंमपा शिक्षण विभागाने दिलेल्या कॅलेंडरनुसार प्रत्येक शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने काही शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ या विषयावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थी या निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व उपक्रमांमध्ये आपापल्या आवडीनुसार मोठ्या संख्येने सहभागी झाले. सदर गटनिहाय घेण्यात आलेल्या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत व्हावा व भविष्यामध्ये भारताचे सुसंस्कृत नागरिक तयार व्हावेत याकरिता निबंध व वक्तृत्व स्पर्धा या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने निबंध लेखन केले तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होत आपले विचार मांडले.
काही शाळांनी आपापल्या शालेय परिसरात तिरंगा रॅली काढून नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवून राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे आवाहन केले. तिरंगा रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह पालक आणि आजी – आजोबा हे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये 4 प्रकारे घरीच कच-याचे वर्गीकरण करावे व शहर स्वच्छतेत आपले योगदान द्यावे याबाबतही माहिती देत नागरिकांना आवाहन करण्यात आले.
काही शाळांत तिरंगा रांगोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्राभिमान साकारण्याची संधी देण्यात आले. राष्ट्रध्वजामध्ये असलेल्या केशरी, पांढरा व हिरवा अशा 3 रंगांचा वापर करून विद्यार्थ्यांनी विविध रांगोळ्या काढल्या. विद्यार्थ्यांच्या पालकांनाही या रांगोळ्या पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांमध्येही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
Post Views: 3