लोणावळा : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोणावळा येथील कै. दी. गो. तेंडुलकर विश्रामधामात नुकत्याच करण्यात आलेल्या नूतनीकरणानंतर आता परिसर अधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने विशेष वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत विश्रामधामाच्या परिसरात आंबा, फणस, चीकू, काजू, आवळा यांसह विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली.
मुंबई मराठी पत्रकार संघाने आपल्या सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी लोणावळ्यातील विश्रामधामाचे फाईव्हस्टार दर्जाचे नूतनीकरण केले आहे. विश्रामधामातील सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच येथील नैसर्गिक सौंदर्य जपण्यावरही संघाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून परिसरात मोठ्या प्रमाणावर फळझाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या विशेष वृक्षारोपण सोहळ्यास लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष व भाजप नेते श्रीधर पुजारी, मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचे माजी मुख्य अभियंता मल्लेश्वर कुंटाजी, तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण तसेच प्रभाकर कदम, ज्येष्ठ फोटोग्राफर प्रदीप कोचरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची रोपे लावून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाचे योग्य संगोपन आणि संवर्धन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी अध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.
लोणावळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या दि. गो. तेंडुलकर विश्रामधामाचा परिसर आगामी काळात अधिक हिरवागार व्हावा आणि येथे येणाऱ्या पत्रकार सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाने विश्रामधामाच्या नूतनीकरणानंतर पर्यावरण संवर्धनाची जोड देत हाती घेतलेल्या या विशेष वृक्षारोपण मोहिमेमुळे भविष्यात संपूर्ण परिसर विविध फळझाडांनी बहरणार आहे.




