ताज्या बातम्या

SGM कॉलेजसमोर फुटपाथ अतिक्रमण; विद्यार्थ्यांना रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास

कराड : कराडमधील सद्गुरू गाडगे महाराज (SGM) कॉलेजसमोर फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. फुटपाथ चालण्यासाठी असतानाही त्याचा वापर विविध व्यवसाय, हातगाड्या अथवा इतर कारणांसाठी होत असल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने थेट रस्त्यावरून चालावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
SGM कॉलेजमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. महाविद्यालयाच्या अधिकृत माहितीनुसार वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात १२,५०० हून अधिक विद्यार्थी आहेत.
रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि त्याच मार्गावरून चालणारे विद्यार्थी यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळी कॉलेज सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
कराडच्या विद्यानगरीतील फुटपाथ अतिक्रमणाचा प्रश्न यापूर्वीही समोर आला असून फुटपाथ गायब झाल्याने विद्यार्थी व नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
फुटपाथ नेमका कोणासाठी? विद्यार्थ्यांना रस्त्यावर चालण्यासाठी की पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग देण्यासाठी? असा सवाल उपस्थित होत असून संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून फुटपाथ अतिक्रमणमुक्त करावा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

Scroll to Top