ताज्या बातम्या

मी विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

प्रतिनिधी : मोदी सरकार संसदेत कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांनी बुधवारी स्पष्ट केले. “मी संसदेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे, परंतु विरोधकांना कोणतीही चर्चा व्हावी असे वाटत नाही. भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहे; विरोधकांनी फक्त संसदेचे कामकाज चालू द्यावे”, असे श्री. शाह म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांनी विरोधकांना एक स्पष्ट प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार विरोधकांनी आज दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभेच्या अध्यक्षांना चर्चेची विनंती करणारे पत्र सादर करावे. चर्चा आज दुपारी 3 वाजता सुरू होईल आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहील. श्री. शाह म्हणाले की, लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिल्यास, सरकार प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलण्यास तयार आहे, जेणेकरून आज दुपारी 3 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत सविस्तर चर्चा होऊ शकेल.
श्री. अमित शाह यांनी सांगितले की, ते स्वतः सभागृहात बसतील, सर्वांचे म्हणणे ऐकतील आणि उद्या दुपारी 3 वाजता विरोधी पक्षाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतील. सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही. चर्चेमुळे देशातील जनतेसाठी सर्व काही स्पष्ट होईल – सत्य समोर येईल.
विरोधी पक्षाच्या मागणीबाबत केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, काहीजण त्यांना निवेदन देण्यास सांगत असले तरी, इतक्या गंभीर विषयावर अशाप्रकारे चर्चा होऊ शकत नाही. संसदेत चर्चेसाठी स्थापित नियम आणि कार्यपद्धती आहेत आणि संसदीय कार्यपद्धतीनुसार सविस्तर चर्चा आवश्यक असते, आणि संसदीय परंपरेनुसार निवेदन दिले जाईल.
अधिवेशन सुरू झाल्यापासून आपण नियमितपणे संसदेत उपस्थित राहत आहोत, परंतु विरोधी पक्ष दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखत आहेत. संसदीय कामकाज मंत्री श्री. किरेन रिजिजू यांनी सरकारच्या वतीने आधीच स्पष्ट केले आहे की, सरकार कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहे, चर्चेसाठी वेळ दिला जावा आणि विरोधी पक्षानेही तयार राहावे. विरोधी पक्ष यापूर्वी ही मागणी करत होता आणि सरकारने ती मान्य केली आहे, असे श्री. शाह यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह म्हणाले की, आता विरोधी पक्षाने ठरवायचे आहे की चर्चा करायची की गोंधळ घालायचा, आणि जनता ठरवेल की कोणाला चर्चा करायची आहे आणि कोण पळ काढत आहे.

Scroll to Top