
कराड : कराड तालुक्यातील कोल्हापूर नाका परिसरात मूलभूत सुविधांची अक्षरशः दुरवस्था झाली असून, रस्ते आणि गटारांची अवस्था पाहता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
परिसरातील गटारांमध्ये कचरा, गाळ व घाण साचल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असून रस्त्यावर पाणी साचून नागरिक व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब झाल्याने खड्डे आणि असमतोल रस्त्यामुळे अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.
एकीकडे विकासकामांच्या घोषणा आणि दुसरीकडे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष, अशी परिस्थिती कोल्हापूर नाका परिसरात दिसून येत आहे. नियमित गटार सफाई, पाणी निचरा आणि रस्ते दुरुस्ती यासारख्या मूलभूत कामांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कोल्हापूर नाका हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक व वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहण्यापेक्षा आत्ताच रस्ते व गटारांची पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
‘खड्डे बुजवा, गटारे साफ करा; नागरिकांना मूलभूत सुविधा द्या!’




