ताज्या बातम्या

तापोळा आरोग्य केंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; ग्रामीण आरोग्य सेवांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

तापोळा(नितीन गायकवाड) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी दरेगाव येथे भेट देत कोयना, सोळशी आणि कांदा परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी तापोळा परिसराला जोडणाऱ्या प्रस्तावित तापोळा पुलाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेतली.
यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, तापोळा येथे सदिच्छा भेट देत आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचार सुविधा, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी तसेच आरोग्य केंद्रातील उपलब्ध वैद्यकीय सुविधा यांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
ग्रामीण भागातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, तत्पर आणि प्रभावी आरोग्य सेवा पुरविल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय यंत्रसामग्री आणि सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, ग्रामविकास विभागाचे विभुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद सदस्य अजित सकपाळ, उपसभापती संजय मोरे, शिवसागर बोट क्लबचे चेअरमन आनंद धनावडे, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल सकपाळ, तापोळ्याचे सरपंच रमेश धनावडे, तालुकाप्रमुख गणेश उतेकर, राम सकपाळ, सचिन कदम, हरेश जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीमुळे तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा सकारात्मक संदेश या दौऱ्यातून मिळाला.

Scroll to Top