मुंबई : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रीय मराठा पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध प्रलंबित जनहिताच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी केले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष परमेश्वर देशमुख आणि राष्ट्रीय सहसचिव शुभम पाटील उपस्थित होते. विविध विकासकामे आणि जनहिताच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात राज्यातील संवेदनशील परिसरातील ५०० मीटरच्या हद्दीत असलेली सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याची मागणी करण्यात आली. तसेच लोणावळा ते ऊरळी कांचन (पुणे) दरम्यान उपनगरी (लोकल) रेल्वे सेवा सुरू करावी, लातूर जिल्ह्यातील देवणी येथे एसटी बस डेपो उभारावा आणि महापारेषणचे १३२ केव्ही उपकेंद्र (सबस्टेशन) स्थापन करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या.
याशिवाय मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक तातडीने उभारावे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला ८५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली.
शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागांमार्फत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिले.




