मुंबई(रमेश औताडे) : मुंबईतील आरे परिसरातील प्लॉट क्रमांक ३०७ समोर रॉयल प्लंब उर्फ अमीर पार्क परिसरात झाडांची कत्तल करून शूटिंग झोनसाठी मोठ्या प्रमाणात भरणी करून या ठिकाणी चित्रिकरणासाठी मोठ्या आकाराचे डोम उभारण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने गांभीर्याने कारवाई करत सखोल चौकशी केली पाहिजे. अन्यथा मंत्रालयासमोर झाडे लावा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार साहेब पक्ष) जोगेश्वरी तालुका अध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांनी केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शूटिंग डोमसाठी परवानगी देण्यात आली होती का ? तसेच पर्यावरण आणि वृक्ष प्राधिकरणाच्या नियमांचे पालन झाले आहे का ? किती, कशी, कोणत्या जागेसाठी, काय अटी शर्ती घालून पालिकेने परवानगी दिली ? याबाबत स्पष्टीकरण अस्पष्ट आहे असे लोंढे यांनी सांगितले.
आरे हे मुंबईचे “हरित फुफ्फुस” म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या परिसरातील पर्यावरणाची हानी वारंवार होत आहे. बेकायदेशीर वृक्षतोड व भरणीची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करतो असे पालिका अधिकारी बोलतात. मात्र कागदोपत्री कारवाई करून जेवढी हानी केली आहे तेवढी झाले जतन करण्याची शिक्षा त्यांना दिली पाहिजे असे सचिन लोंढे यांनी सांगितले.




