मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. 14 सप्टेंबर 2026 रोजी गणरायाचे आगमन होत असल्याने मुंबई, गुजरात आणि इतर भागांतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘ट्रेन ऑन डिमांड (TOD) – एक्स्ट्रा रश’ योजनेअंतर्गत 8 जोड्या (16 गाड्या) आणि एकूण 21 विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर सप्टेंबर महिन्यात या गाड्या धावणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या या विशेष गाड्यांमुळे मुंबई, गुजरात, कोकण आणि कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सर्व गाड्या विशेष भाड्याने धावतील. मात्र बांद्रा टर्मिनस–रत्नागिरी विशेष गाडी अनारक्षित (Unreserved) स्वरूपात चालविण्यात येणार आहे.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक
09013/09014 – मुंबई सेंट्रल–ठोकूर (साप्ताहिक) – 1 फेरी
09019/09020 – मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड (आठवड्यातून 4 दिवस) – 8 फेऱ्या
09035/09036 – बांद्रा टर्मिनस–रत्नागिरी (साप्ताहिक, अनारक्षित) – 2 फेऱ्या
09114/09113 – वडोदरा–रत्नागिरी (साप्ताहिक) – 1 फेरी
09110/09109 – विश्वामित्री–रत्नागिरी (द्विसाप्ताहिक) – 4 फेऱ्या
09124/09123 – विश्वामित्री–रत्नागिरी (साप्ताहिक) – 2 फेऱ्या
09022/09021 – उदना–रत्नागिरी (साप्ताहिक) – 2 फेऱ्या
09030/09029 – वलसाड–रत्नागिरी (साप्ताहिक) – 1 फेरी
या विशेष गाड्यांची सविस्तर माहिती NTES आणि ICMS प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येणार असून, आरक्षणाची सुविधा IRCTC तसेच रेल्वे आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असेल. स्थानकांवर माहिती फलक, उद्घोषणा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रवाशांना माहिती देण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता, प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.




