ताज्या बातम्या
सीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेकडून सत्कार“कॅमेऱ्यांना वाहन क्रमांक दिसतो, मग रस्त्यांवरील खड्डे का दिसत नाहीत?” – नागरिकांचा संतप्त सवालराजश्री शाहू महाराज मानधन योजनेतील विलंबाबाबत कलाकारांचा संताप; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनतहसील कार्यालयात तंबाखूचा विळखा; थुंकण्यासह तंबाखूचे ढीग, नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्याची गरजयशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ वितरण सोहळा १५ ऑगस्टला वाशीत आमदार चित्रा वाघ, विजय चौगुले, मनोज सानप यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

राजश्री शाहू महाराज मानधन योजनेतील विलंबाबाबत कलाकारांचा संताप; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदन

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ, गरजू आणि आजारी कलावंतांना दिल्या जाणाऱ्या “राजश्री शाहू महाराज साहित्यिक व वृद्ध कलावंत मानधन सन्मान योजने” अंतर्गत मानधन वितरणात होत असलेल्या विलंबाबाबत ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र, मुंबईने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे*.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुभाष जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई उपनगरातील कलाकारांच्या मानधनासाठी दोन याद्या सांस्कृतिक कला संचालनालयाकडे पाठवून दीड महिना उलटून गेला आहे. पहिल्या यादीतील काही कलाकारांच्या खात्यात जून महिन्यापासून तीन हप्ते जमा झाले असले, तरी अनेक पात्र कलाकारांचे मानधन अद्याप सुरू झालेले नाही.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, संचालनालयात वारंवार पाठपुरावा करूनही “ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचण आहे, ती लवकरच दूर होईल,” असेच उत्तर दिले जात आहे. मात्र, अनेक गरीब, आजारी आणि वृद्ध कलावंत मानधनाच्या प्रतीक्षेत असून काहींची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात ठाणे, मुंबई शहर, पुणे, नांदेड आणि लातूरसह विविध जिल्ह्यांतील अनेक कलाकार २०२३ ते २०२६ या कालावधीपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. “कलावंत होणे हा त्यांचा गुन्हा आहे का?” असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे.
यावेळी संघटनेने केवळ मानधनाचा प्रश्न न मांडता लोककलावंतांच्या सर्वांगीण कल्याणासाठी १२ महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे केल्या आहेत. त्यामध्ये लोककलावंत बोर्डाची स्थापना, नियमित मानधन, आरोग्य व अपघात विमा, प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण व संशोधन केंद्रे, शासकीय विश्रामगृहात निवास सुविधा, कलाकारांसाठी घरकुल योजना, नाट्यगृह भाड्यात समानता तसेच सांस्कृतिक कला संचालनालयाचे अधिकृत ओळखपत्र देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र, मुंबईने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन रखडलेले मानधन तातडीने वितरित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कलाकारांच्या जीवनाशी निगडित हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज असल्याचेही संघटनेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

Scroll to Top