मुंबई, दि. ३१ : भायखळ्यातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या नूतनीकरण व विस्तारीकरणानंतरच्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे नाट्यगृह केवळ एक सांस्कृतिक वास्तू नसून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा करणारे प्रेरणास्थान आहे. मराठी भाषा, साहित्य, लोककला आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यात या नाट्यगृहाची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अण्णाभाऊ साठे यांनी शोषित, वंचित, कष्टकरी आणि दलित समाजाच्या वेदना आपल्या साहित्याद्वारे मांडल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून दिलेले योगदानही उल्लेखनीय असल्याचे सांगत, त्यांच्या साहित्याने मराठी संस्कृतीला जागतिक ओळख मिळवून दिली, असे शिंदे म्हणाले.
नूतनीकरणामुळे नाट्यगृह अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज झाले असून, नवोदित कलाकार, नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी ते महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. हे नाट्यगृह सर्वसामान्य कलाकारांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले.
याच दिवशी सकाळी चिरागनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्याचा उल्लेख करत, वाटेगाव येथे ५० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणारे स्मारकही अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करणारे ठरेल, असे शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करून समाजापर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.




