ताज्या बातम्या

शिक्षणतज्ज्ञ डॉ. सौ. सुनिता कामटे यांच्या सन्मानाचा ह्रुद्य सोहळा ; ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्राचार्या म्हणून सेवानिवृत्त

मुंबई : बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सौ. सुनिता सुनील कामटे या आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ श्री. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली एक ह्रुद्य सोहळा संपन्न झाला. सुविद्या प्रसारक संघाच्या याच महाविद्यालयातील पूर्वीच्या प्राचार्या सौ. सुहासिनी कुळकर्णी यांच्या पावलावर पाऊल ठेवून सौ. सुनिता कामटे यांनी शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावली. पीएचडी मिळवली. शिक्षिका, उप प्राचार्या, प्राचार्या अशी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असतांना तीन विविध संस्थांचेआदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता प्रतिभा रत्न पुरस्कार डॉ. सौ. सुनिता कामटे यांनी मिळविले. आज शाळेच्या प्रशस्त सभागृहात सेवापूर्ती शुभेच्छा सोहळा पार पडला. यावेळी महादेव गोविंद रानडे, सुविद्या प्रसारक संघाच्या कार्याध्यक्षा श्रीमती देवयानी सबनीस, सहकार्यवाह सौ. वर्षा कुलकर्णी, सदस्य श्री विजय वडतकर यांच्या शुभहस्ते डॉ. सौ सुनिता कामटे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिकांनी डॉ. सौ. सुनिता कामटे यांचे औक्षण केले तसेच खणा नारळाने ओटी भरली. डॉ. सौ. सुनिता कामटे यांचे पती श्री सुनील कामटे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. कृतज्ञता सोहळ्यात बोलतांना डॉ. सौ. सुनिता कामटे या अत्यंत भावूक झाल्या आणि तेहतीस वर्षांचे प्रसंग सांगताना विशेषकरून सौ. सुहासिनी कुलकर्णी यांच्या बरोबरच्या सहवासातील दिवस आठवतांना त्यांचे डोळे पाणावले होते. क्षणभर त्या थांबल्या आणि मग आपले विचार पूर्ण केले. श्री. फडतरे, श्री संजय पाटील, श्री सचिन गवळी, श्रीमती प्राची वालकर, श्रीमती वृंदा ठाकर, श्री संजय सर्जे, श्रीमती ज्योती पिंपळे, आदींनी डॉ. कामटे यांच्या गौरवपूर्ण कारकीर्दीबद्दल त्यांचा गुणगौरव केला. श्री रामचंद्र गिरी यांनी सूत्रसंचालन केले. श्री गिरीश चौधरी यांनी ध्वनी चित्रफित तयार केली होती. आभार प्रदर्शन श्री अतुल काटे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन योजना कनिष्ठ महाविद्यालय कर्मचारीवृंद यांनी केले.

Scroll to Top