मुंबई : बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके वेळेत अदा करण्यासाठी तसेच मुंबईकरांना सुरक्षित, आधुनिक आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून मंजूर अनुदानातील उर्वरित ₹५०० कोटी तातडीने वितरित करण्यात यावेत, अशी मागणी बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन केली.
यावेळी उपमहापौर संजय घाडी आणि नगरसेवक आकाश पुरोहित हेही उपस्थित होते. बैठकीत बेस्ट उपक्रमाची सध्याची आर्थिक परिस्थिती, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न आणि प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट हा मुंबईकरांच्या जीवनवाहिनीचा कणा असल्याचे सांगत, आर्थिक बळकटी मिळाल्यास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न मार्गी लागेल आणि प्रवाशांसाठी आधुनिक, सुरक्षित व अधिक कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, उर्वरित ₹५०० कोटींच्या अनुदानाबाबत लवकरच योग्य निर्णय होईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.




