
मुंबई, दि. ३१ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या चिरागनगर (घाटकोपर) येथील कर्मभूमीत उभारण्यात येणाऱ्या ‘लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ आणि भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि साठे कुटुंबीय उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार जागतिक स्तरावर पोहोचले असून चिरागनगरातील हे स्मारक वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान ठरेल. स्मारक उभारताना परिसरातील प्रत्येक कुटुंबाचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्यात येणार असून कोणालाही बेघर करून विकास केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जुलै २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावी वाटेगाव येथेही ५० कोटी रुपयांत स्वतंत्र स्मारक उभारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘आर्टी’ (ARTI) संस्थेमुळे मातंग समाजातील युवकांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.
या स्मारकात २० मीटर उंच कांस्य पुतळा, डिजिटल अनुभव दालन, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ‘वॉक विथ अण्णा भाऊ’ दालन, ॲम्फिथिएटर आणि अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार असून हे स्मारक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासातील महत्त्वाचे प्रेरणास्थान ठरणार आहे.




