ताज्या बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाला साताऱ्यात सुरुवात

सातारा(अजित जगताप) : जग बदल घडवूनी गेले राव… सांगून गेले मज भीमराव.. अशी काव्यपंक्ती लिहून प्रेरणा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती साताऱ्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्याचा शुभारंभ झाला आहे. विविध कार्यक्रमाने सध्या संपूर्ण सातारा हा अण्णाभाऊमय झाला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. या दिवशी सातारा जिल्ह्यातील साहित्यिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रामध्ये परिवर्तनवादी विचारांची तुतारी फुगली गेली आहे. आपल्या साहित्याच्या लेखणीतून गावकुसाबाहेरील फकीरा त्यांनी नायक म्हणून उभा केला. तीच फकीरा कादंबरी हातात घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कती पुतळा सातारा शहरात मोठ्या दिमाखात उभा राहिलेला आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर विद्युत रोषणाई व विविध कार्यक्रमाने कार्यकर्त्यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे.
१ ऑगस्ट हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या अक्षर अण्णाभाऊ साठे जयंतीचे स्वरूप व कार्यक्रम अभिवादन व पुष्पहार अर्पण करताना त्यांच्या फकीरा कादंबरीचे हे पूजन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहली गेलीआहे.
समतेची मशाल प्रज्वलित करून पुनम शंकर कवळे, समितीचे पदाधिकारी रघुनाथ बाबर, किशोर गालफाडे, अण्णा वायदंडे, सत्यवान कमाने, अजित जगताप, अँड .संतोष कमाने, डॉ. रमाकांत साठे,, अमर गायकवाड, नितीन तुपे, सचिन पाटोळे, गौतम भोसले, माधव साठे, रामचंद्र दुबळे यांच्यासह फुले-शाहू- आंबेडकर विचार धारेला मानणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी लोकशाहीरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी युगपुरुषांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. सातारा नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेवक सचिन पाटोळे, नगरसेवक भालुगडे व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या भोवती विद्युत रोषणाई तसेच पिवळ्या ध्वजाने संपूर्ण पुतळा परिसर हा पिवळामय करण्यात आला होता.
लोकशाहीर याच्या जयंतीनिमित्त
सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पोवाडे, लोकनाट्य, आणि त्यांच्या साहित्यावर आधारित गायन-नृत्य कार्यक्रम व वैचारिक प्रबोधन व्याख्यान आणि विचारमंथन होत आहे.

——————————————–
फोटो– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात अभिवादन करताना मान्यवर (छाया- अजित सोनवणे)

Scroll to Top