ताज्या बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा जिल्ह्यात विनम्र अभिवादन

सातारा(अजित जगताप) : ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे. व जग बदल घालुनी घाव …सांगून गेले मज भीमराव … माझी मैना गावावर राहिली …माझ्या जीवाची होती या काहीली.. असे काव्य लिहिणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ५७व्या पुण्यतिथीनिमित्त आज सातारा किल्ल्यात तसेच सातारा नगरपरिषद व विविध मान्यवरांच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ तथा तुकाराम भाऊराव साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सातारा नगर परिषदेच्या कार्यालयात शेजारील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , भारतरत्न. डॉ बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या,१५ कथासंग्रह, लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन अशा विपुल साहित्याची निर्मिती केलेली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान म्हणजे ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूषण नव्हे तर भारतरत्न आहेत. त्यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी सातत्याने होत आहे. परंतु सत्तेतील पक्ष ही मागणी पूर्ण करत नाही. याची खंत सर्व साहित्यिकांना वाटत आहे. शेकडो ठराव झाले पण, त्याची अंमलबजावणी होत नाही. याचाही अनेकांनी आपल्या अभिवादन कार्यक्रमात उल्लेख केला.
सातारा सांगली जिल्हा एकत्र असताना सातारचे सुपुत्र म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे च्या साहित्य बाबत अनेक मान्यवरांनी अभ्यास केला आहे. आज त्यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी.बनकर,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष श्री अशोक गायकवाड, नगरपालिका आर्थिक दुर्बल घटक सभापती श्री संकेत साठे,नगरसेविका सावित्री बडेकर,अर्चना कांबळे, प्रकाश वायदंडे, सचिन कांबळे यांनी सातारा शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला आदरांजली वाहिली.
यावेळी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक समतेसाठीचा संघर्ष आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील फुले- शाहू- आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश भिसे, अमर गायकवाड, प्रा.अरुण गाडे, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, गौरी आवळे, मार्गदर्शक पत्रकार अनिल वीर, अँड विलास वहागावकर, अमोल गंगावणे,उमेश चव्हाण,मधुकर आठवले, वामन मस्के, आदित्य गायकवाड, पूजा बनसोडे, विशाल भोसले, रमेश गायकवाड, गणेश कारंडे, उमेश खंडझोडे, आनंदा साठे ,अण्णा वायदंडे, रमेश उबाळे, किशोर गालफाडे, अक्षय कांबळे, मच्छिंद्रनाथ जाधव, संजय गाडे, ऋषिकेश गायकवाड, आप्पा तुपे, अमोल पाटोळे, राजेंद्र ओव्हळ, राजेंद्र कांबळे, विशाल वायदंडे, रघुनाथ बाबर, सतीश कांबळे, मदन खंकाळ, सोमनाथ धोत्रे, शाहरुख शेख यांच्यासह मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या अभिवादन कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील पुरोगामी तसेच फुले सेवा आंबेडकर विचार झालेला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो, क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांचा विजय असो… लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा विजय असो.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो.. अशा घोषणाबाजी देत विनम्र अभिवादन केले. नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————————————
फोटो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मान्यवर (छाया- निनाद जगताप)

Scroll to Top