नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत गट-अ, गट-ब आणि गट-क मधील विविध पदांसाठी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, दि. 21 व 22 जुलै 2026 रोजी ही परीक्षा राज्यातील 6 जिल्ह्यांतील 13 परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि काटेकोरपणे राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी 20 संवर्गांतील 132 पदांसाठी एकूण 19,220 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 6 संवर्गांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार असून, 18,930 उमेदवार परीक्षेस पात्र ठरले आहेत. उमेदवारांना त्यांच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देता यावी, यासाठी केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे वर्ग-1 अधिकारी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोन ते तीन अधिकारी केंद्र निरीक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत.
जिल्हानिहाय परीक्षार्थींची संख्या पुढीलप्रमाणे आहे –
अमरावती – 1,112, छत्रपती संभाजीनगर – 2,535, मुंबई – 8,123, नागपूर – 948, नाशिक – 1,783, पुणे – 4,429 ही परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS iON) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेस पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र (Admit Card) 10 जुलै 2026 पासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले असून, एसएमएस आणि ई-मेलद्वारे त्याबाबत माहितीही देण्यात आली आहे.
महापालिकेने उमेदवारांना प्रवेशपत्र आणि माहिती पुस्तिकेतील सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संवर्गनिहाय परीक्षा वेळापत्रक नवी मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे आमिष, आर्थिक व्यवहार किंवा फसवणुकीच्या प्रयत्नांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. अशा प्रकारच्या घटना आढळल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीविषयीची अधिकृत माहिती केवळ नवी मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ आणि अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवरूनच घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.




