नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (एनएमएमटी) उपक्रमाचा कारभार अधिक गतिमान, प्रवासीभिमुख आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त व्हावा यासाठी पहिल्या टप्प्यातील ५१ नवीन सीएनजी बसेसचे लोकार्पण आज घणसोली डेपो येथे करण्यात आले. वर्षभरात टप्प्याटप्प्याने एकूण १५० नवीन सीएनजी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे.
एनएमएमटीने सीएनजी बसेसना प्राधान्य देत प्रवाशांच्या सुविधेला सर्वोच्च महत्त्व दिले आहे. नव्याने दाखल झालेल्या बसेसमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच प्रमुख मार्गांवरील बसफेऱ्यांची वारंवारता वाढणार असल्याने प्रवाशांना बसची दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि त्यांच्या वेळेचीही मोठी बचत होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या सीएनजी बसेसमुळे हवेचे तसेच ध्वनीप्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल. नवी मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि ‘ग्रीन सिटी’ बनविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या नवीन सीएनजी बसेसचे लोकार्पण नवी मुंबईचे शिल्पकार तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत कर्मचारी व प्रशासन अधिकारी, श्रीमती प्रमिला केतन चाबूकस्वार, तुर्भे डेपो मॅनेजर ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.




