कराड(प्रताप भणगे) : कराड बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर फूटपाथवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना फूटपाथऐवजी थेट रस्त्यावरून चालत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.
फेरीवाले, हातगाड्या आणि इतर व्यावसायिकांनी फूटपाथ व्यापल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. बस स्थानक परिसरात कायम गर्दी असल्याने वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत रस्त्यावरून चालणे धोकादायक ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस कारवाई केलेली नसल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी तातडीने फूटपाथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास भविष्यात गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




