मुंबई : शिक्षणातून प्रोत्साहन, कौशल्यातून स्वावलंबन हया तत्त्वावर अवलंबून सालाबादप्रमाणे यंदाही सुधीर थोरवे व वैशाली थोरवे परिवाराने मित्रमंडळींच्या उपस्थितीत डफोफिल स्कूल, डिकसळ तसेच जनता विद्या मंदिर, दहिवली ह्या कर्जत येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
थोरवे कुटुंबीय गेली अनेक वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवत असून, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच पर्यावरण, सामाजिक सेवा व जनजागृती अशा विविध क्षेत्रांतही ते सक्रियपणे कार्यरत आहेत. समाजसेवेची आवड आणि सामाजिक बांधिलकी जपत वर्षभरात सहा ते सात विविध सामाजिक उपक्रम ते स्वबळावर आयोजित करतात. या सर्व उपक्रमांना संघटित स्वरूप मिळावे, या उद्देशाने त्यांनी नुकतीच विभा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे.
यावर्षी शैक्षणिक साहित्य वाटपाबरोबरच आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठीही त्यांनी नवा उपक्रम सुरू केला आहे. मुंबईस्थित अक्षय धागा ह्यांच्या सहकार्याने कोंडीवडे येथील आदिवासी भागात शिवणकला प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. ९० दिवसांच्या या प्रशिक्षणात ३० आदिवासी महिलांचा सहभाग असून, त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या तीनही उपक्रमांच्या प्रसंगी श्री.सुधीर थोरवे व सौ.वैशाली थोरवे यांच्यासमवेत विनायक उपाध्याय(डेफोडील शाळेचे संचालक), तानाजी भोईर, राणी थोरवे, शरद पवार, प्रशांत गायकवाड, राव कुटुंबीय तसेच अक्षय धागाचे श्री. नारायण अय्यर आणि सौ. नीता पाटील उपस्थित होते.
डेफोडील स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. आरती सावंत तसेच जनता विद्या मंदिरचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर घुगे आणि प्रताप गीते यांनी या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाबद्दल थोरवे परिवाराचे आभार मानले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पुढील आठवड्यात आयोजित करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला हातभार लावण्याचे आश्वासन दिले.




