सातारा : राज्यभरात वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) सक्तीची करण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशा परिस्थितीत सातारा बसस्थानक परिसरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) एक बस HSRP नंबर प्लेटशिवाय धावत असल्याचे समोर आल्याने वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
HSRP नंबर प्लेट नसलेल्या खासगी वाहनांवर नियमितपणे दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, शासनाची बसच विना HSRP नंबर प्लेट रस्त्यावर धावत असल्याचे आढळल्याने नियमांची अंमलबजावणी सर्वांसाठी समान आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, शासनाच्या मालकीच्या वाहनांनीच वाहतूक नियमांचे आदर्शवत पालन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे संबंधित परिवहन विभागाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित बसची तपासणी करावी. HSRP नंबर प्लेट बसविणे आवश्यक असल्यास ती तात्काळ बसविण्याची कार्यवाही करावी आणि नियमांची अंमलबजावणी कोणताही भेदभाव न करता सर्व वाहनांसाठी समानपणे करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्याबरोबरच शासनाच्या वाहनांनीही त्याचे काटेकोर पालन केल्यास नागरिकांमध्ये नियमांविषयी अधिक विश्वास आणि शिस्त निर्माण होईल, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.




