ताज्या बातम्या

झेब्रा क्रॉसिंग नक्की कुठे असावे? नागरिकांमध्ये संभ्रम; नियमांचे पालन करण्याची गरज

कराड(प्रताप भणगे ) : शहरातील अनेक चौक, शाळा, रुग्णालये आणि मुख्य रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग सिग्नलपासून खूप पुढे किंवा मागे असल्याचे दिसते, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे पुसट झाल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होत आहे.
वाहतूक नियमांनुसार झेब्रा क्रॉसिंग हे पादचाऱ्यांनी सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी असते. सिग्नलयुक्त चौकांमध्ये ते सामान्यतः वाहनांच्या स्टॉप लाईनच्या पुढे, पण चौकात अडथळा निर्माण होणार नाही अशा सुरक्षित अंतरावर असणे अपेक्षित असते. वाहनचालकांनी स्टॉप लाईनच्या मागे थांबून झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवणे आवश्यक आहे.
मात्र अनेक ठिकाणी वाहने थेट झेब्रा क्रॉसिंगवर उभी राहत असल्याने पादचाऱ्यांना वाहनांच्या मधून मार्ग काढावा लागतो. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि शालेय विद्यार्थ्यांना विशेषतः अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांनी संबंधित प्रशासनाने शहरातील सर्व झेब्रा क्रॉसिंगची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी नव्याने पट्टे रंगवावेत, स्टॉप लाईन स्पष्ट कराव्यात आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी जनजागृती तसेच कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Scroll to Top