मुंबई : चेंबूर परिसरातील 11 नंबर रोडवर मंगळवारी सकाळी शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात किमान 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
झाड थेट बसवर कोसळल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काही विद्यार्थी बसमध्ये अडकून पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू केले.
उपमहापौर संजय घाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याचा बसमध्ये अडकलेला असल्याची शक्यता असून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिका आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. बसवर पडलेले झाड हटविण्याचे काम सुरू असून संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला आहे.
ही बस कोणत्या शाळेची होती, बसमध्ये एकूण किती विद्यार्थी होते आणि झाड कोसळण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून बचाव आणि मदतकार्याला प्राधान्य देण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे चेंबूर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




