मुंबई : आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण तापले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेत त्यांच्या मागण्या आणि सूचना ऐकून घेतल्या. या शिष्टमंडळात रिपब्लिक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मोर्चानंतर झालेल्या या बैठकीत शिष्टमंडळाने आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील विविध मागण्या आणि सूचना शिंदे यांच्यासमोर मांडल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, या विषयाचा सखोल अभ्यास करूनच सरकार निर्णय घेईल.
“या विषयाची सर्वांगीण माहिती घेणे आवश्यक आहे. प्रत्येक समाजाची लोकसंख्या, त्यांना मिळणारे आरक्षणाचे लाभ आणि इतर सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. महायुती सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. सर्व समाजांना न्याय मिळेल, ही सरकारची स्पष्ट भूमिका आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आज सुमारे २५ आमदारांनीही या विषयावर माझी भेट घेतली. आनंदराज आंबेडकर, बबनराव घोलप आणि राजकुमार बडोले यांना मी सांगितले आहे की, उद्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल. कोणताही प्रश्न किंवा मतभेद चर्चेतून सोडवण्यावर सरकारचा विश्वास आहे. यापूर्वीही अनेक प्रश्न संवादातून मार्गी लागले आहेत. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही आणि सर्वांना न्याय देणारा निर्णयच सरकार घेईल




