कराड(प्रताप भणगे) : कराड-मलकापूर परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला होता. याबाबत ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून नागरिकांची गैरसोय आणि स्वच्छतेचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.
या वृत्तांची दखल घेत कराड-मलकापूर नगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली आहे. वारंवार जनजागृती व आवाहने करूनही काही नागरिकांकडून रस्त्याकडेला कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर प्रभावी नजर ठेवली जात असून, अशा प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता सुधारण्यास मदत होत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
SDM न्यूज डिजिटल पोर्टलने उपस्थित केलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नाची दखल घेत नगरपालिकेने केलेल्या या उपाययोजनेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तसेच, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही कचरा निर्धारित ठिकाणीच टाकून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.




